कासारवेली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. ग्रामपंचायतीमार्फत वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड तसेच नागरिकांना वैयक्तिक वृक्ष वाटप केले जाते. पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी प्लास्टिक-मुक्त अभियान हाती घेण्यात आले असून, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि त्याऐवजी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करावा, याबाबत सतत जनजागृती करण्यात येते.
कचरा वर्गीकरण योजना अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तयार होणाऱ्या सुका व ओला कचऱ्याचे विभाजन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जाते. उघड्यावर कचरा न टाकता डस्टबिनचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच सुका व ओला कचरा व्यवस्थापनासाठी नडप खत खड्डे आणि गांडूळ खत प्रकल्प उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे.
पावसाचे पाणी साठवण (रेनवॉटर हार्वेस्टिंग) या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून भूजलस्तर वाढीस मदत होते.
तसेच पाणी संवर्धनासाठी दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फत वनराई बंधारे बांधण्यात येतात. या उपक्रमांमुळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पर्यावरण संतुलन राखले जात असून शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे.








